कळकरायला भिडताना !



ढाक-बहिरी या किल्ल्याबद्दल ऐकलं होत. पण कधी तिकडे  जाण्याचा योग आला नव्हता. त्या दिवशी ठरलं . कळकराय सुळका करायचा. ढाक या अवघड किल्याकडे जाण्याआधीच डावीकडे पहारा देत असलेला कळकराय सुळका नजरेत भरतो. 
मुंबई पुणे महामार्गावरून जाताना कामशेत गावातून ढाक-बहिरी कडे जाण्याचा रस्ता लागतो. निसर्गरम्य असं वातावरण आणि वळणवळणाचा सफाईदार रस्ता गावातून जात होता. या वाटेने आम्ही थेट श्री कोंडेश्वर मंदिरा जवळ जाऊन पोहचलो. भलं मोठं पटांगण, दूरवरच पसरलेली हिरवीगार डोंगररांग, निरभ्र आकाश, हवेतील गारवा व शंकर बाप्पाचे टुमदार मंदिर व पुढे विस्तीर्ण जंगल. अशा या ठिकाणी गेल्यावर निसर्गातूनच एखादी सकारात्मक शक्ती आपल्याला साद घालत आहे असच भासतं. हा दिवस आपलाच आहे याची जाणीव या निसर्ग लहरींतून होत असते. 

समोर थेट दिसणारा ढाक चा किल्ला आणि माझे सहकारी मित्र 

आम्ही सर्वानी मंदिराच्या बाहेरूनच नमस्कार केला. पाण्याने, जेवणाच्या डब्यांनी भरलेल्या बॅग व चढाईचे सर्व साहित्य घेऊन आता  नजर जिथे रोखली जात होती त्या सुळक्याजवळ पोहचण्यास  तयार झालो. फार नाही फक्त तास-दीड तासाचा पायी प्रवास होता. डोंगराच्या कडेकडेने जाणारी पायवाट मध्येच उघड्या पठारावरून गर्द झाडीत लुप्त होत होती. किल्ला कधी दिसत होता तर कधी झाडा-डोंगरात गुडूप होत होता. 

आमच्या आगमनाने झाडावरच्या माकडांची चुळबुळ चालू झाली. झाडे हलू लागली. बघता बघता इकडे तिकडे चोहीकडे माकडचं माकड दिसू लागली. आम्हाला घाबरत होते कि आमचं स्वागत करत होती ते याचा काही शेवटपर्यंत पत्ता नाही लागला. पण आमच्या येण्याने त्यांच्या दिनक्रमात व्यत्यय आला होता हे मात्र पक्क होत. 

गर्द झाडीतून बाहेर पडल्यावर पठारावरचा वारा काही शांत उभं राहू देत नव्हता. वारा घोंगावत होता,आम्हाला आमच्या सामानासह उचलून उडवू पाहत होता,या डोंगरावरून, त्या डोंगराकडे. वातावरणातील एकदम झालेल्या बदलामुळे  पाऊस नक्की पडणारच  याची खात्री झाली होती. इतकं छान वातावरण आम्हाला त्या दिवशी लाभल  होत. पण रपरप पाऊस  झाला तर चढाई करणे शक्य नव्हतं. त्यामुळे चिंता देखील वाटत होती. एका पठाराच्या टप्यावरून कळकराय अगदी स्पष्ट दिसत होता,तर त्याच्या वरच्या बाजूला डोकं वर काढून ढाकचा सुळका देखील आपली जागा राखून होता. त्याला सून सुळका असेही म्हणतात. 

किल्याकडे जाणारी पायवाट आणि वर मोकळं आकाश. 

हलकीशी चढण-उतरण करत, करवंदाची जाळी मागे टाकत, माकडांचे चाळे न्हाहाळत आमच्या चमूने ढाकची खिंड गाठली. दरीत उतरणाऱ्या खिंडीतुन डावीकडचा चढणीच्या रस्ता पकडला व आम्ही थेट सुळक्यापाशी पोहचलो. दहा-पंधरा पावले मोजता येईल इतकीशी लहान जागा होती तिथे. आम्ही सामान उतरवलं. उंच अशा सुळक्यापेक्षा माकडांच्या भीतीनेच बॅग वाचवण्यासाठी योग्यरीतीने त्या बांधून, रचून ठेवण्यात आल्या. मात्र, त्या लांबुळक्या जागेत डबे उघडण्याची हिम्मत काही आम्ही केली नाही. तशीही भुक अजून जागृत झाली नव्हती, म्हणून आधी चढाई पूर्ण करून घेऊ मग आरामात जेवण करू असं ठरलं. अवघ्या काही मिनिटांमध्ये सर्वजण हार्नेस, हेलमेट आणि लागणार सर्व साहित्यानिशी सज्ज झाले. "तू लीड क्लाइंबिंग कर" लहुचा आवाज कानावर धडकला. पायथ्यापासून (सोपा) दिसणारा भला मोठा कळकराय मी लीड करणार या विचाराने जरा भारी वाटलं पण जरा टरकले देखील.



"आत्ता नाही तर कधीच नाही, आत्ता घाबरले तर पुढे अशी संधी कधी मिळेल माहित नाही, चल स्नेहल!" मनाने मेंदूला सुचवलं.मग काय, केली हिम्मत. 
QD, कॅराबिनर, डिसेंडर ची माळ कमरे भोवती गुंडाळली गेली. एकदम श्रीमंत झाल्याचा भास झाला. त्या उंच पाषाणरुपी देवाला नतमस्तक झाले. रोप घेऊन सुरुवात केली. बिलेसाठी आणि मार्गदर्शनासाठी लहू पुढे आला. "हो,  सापडला पहिला बोल्ट", दिसला चल दुसरा बोल्ट, अँकरिंग केलं रे, निघते मग.. तिसरा बोल्ट आला रे , बिले लुज, बिले टाईट ". असं म्हणत म्हणत पहिला टप्पा व अनुक्रमे दुसरा टप्पा पूर्ण केला.


तिसरा टप्पा .. तिथून सगळं छान दिसत होत. पण पुढचा बोल्ट आणि होल्ड मात्र अजिबात दिसत नव्हता. अनुभवी मित्रांचे आवाज कानावर पडत होते. पुढे कोणत्या पद्धतीने मी गेले कि मला होल्ड सापडेल हे ते मला सांगत होते. 

मला सुळक्याच्या एका कड्यावरून शरीराचा पिळा करून डाव्या बाजूने, कड्याच्या उजव्या बाजूला (फक्त) कमरेत वळून उजवीकडे सरकायचे होत. या स्थितीत पुढे गेले तरच तिथे मला अँकरिंग करण जमणार होत. हे साध्य करण्यासाठी मी पायावर उभी राहिले. खाली पाहिलं. खाली खोल दरी होती. जिचा तळ देखील दिसत नव्हता आणि इथे  हाताला अँकर लागत नव्हता ना होल्ड.
जरा दमले अन तिथेच थांबले. 

दोन- तीन मिनिटची विश्रांती घेतली. डोकं शांत केलं. बॉडी बॅलेन्स समजून घेतल आणि पुढचं पाऊल टाकणार त्या प्रयत्नात धाडकन माझा फॉल झाला. कड्याच्या धारेने डाव्या  कोपऱ्याच्या हाडाला चांगला मार लागला. गुडघा पण मस्त शेकला गेला. (हे सगळं घरी आल्यावर समजलं जेव्हा ठसठसू लागलं). .. पण पडले म्हणून होल्ड आणि बोल्ट मात्र दिसले. काही क्षणात स्वतःला सावरून, त्या लटकणाऱ्या हिंदोळ्यात आपण अद्याप सुखरूप आहोत याची जाणीव करून घेतली.  

एकांत आणि निवांत 

होल्ड सापडला. त्याचा आधार घेऊन स्वतःला वर घेतले. कातळाचा आधार घेऊन स्थिरावले, पायावर उभी ठाकले. या चढाई मधील सर्वात कठीण, कमरेत ट्विस्ट आणणारा असा हा टप्पा दुसऱ्या क्षणी पूर्ण केला. खालून मित्रांच्या आरोळ्या आणि टाळ्यांमुळे तर आणखीच चेव आला.  बस्स, हा एक टप्पा कौशल्यपूर्ण चढणं म्हणजे कळकराय चढणे होय. 

शेवटच्या टप्प्याची तर गोष्टच निराळी. या ठिकाणी पावसापाण्याने, उन्हाने भुसभुशीत झालेला कातळ चढून जाण्यास त्रास होत होता. कसबस त्या मातीच्या निसरड्या टप्यावरून स्वतःला सावरत माथ्यावर पोहचले. मला धन्य वाटलं. पाणी प्यायले. कोरड पडलेला घसा शांत झाला. सुळक्यावरून नजर सगळीकडे फिरवली. त्या जंगलाच्या चारही दिशांमधील एक एक भाग नजरेत येत होता. ज्या ठिकाणी आम्ही गाड्या लावून उतरलो होतो ते श्री कोंडेश्वर मंदिर देखील आता नजरेस पडत होत. 

लीड क्लाइंबिंग करताना 

बाकीचे माझे सहकारी लहू उघडे, मनोज वांगड, तुषार दिघे आणि कृष्णा मरगळे हे एकामागोमाग एक समिट पॉइंटवर आले. तितक्यात ढग गरजले, मेघ दाटले . काही क्षणातच आम्ही त्या यशस्वी झालेल्या चढाईच्या आनंदात व कोसळणाऱ्या पावसाच्या सरीत भिजलो. 

यशस्वीरीत्या सुळक्यावर चढाई 

आयुष्यातील पहिलं लीड क्लाइंबिंग यशस्वी झालं. माझ्या व एस एल ऍडव्हेंचरच्या डायरीत २७ मे २०२१ ही तारीख नोंदवली गेली.

ठिकाण- कामशेत - किल्ला ढाक बहिरी.
सुळक्याची उंची -१२५ फूट
राहण्याची सोय - गुहा
पाण्याची सोय -गुहेजवळ टाके
टप्पे - ३
श्रेणी- मध्यम
लागणार वेळ - १ ते १. ३० तास (किती जण आहेत यावर अवलंबून आहे, दिलेली वेळ ६ जणांकरिता नोंदवण्यात आली आहे.)
* सुळक्यावर स्की (SCI) बोल्टिंग आहे त्यामुळे क्लाइंबिंग सुरक्षित आहे.
लेख आवडला असल्यास या पेज ला like आणि follow करा. या क्षेत्रातील तुमच्या तीन गिर्यारोहक (ट्रेकर) मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा म्हणजे त्यांना या पानावरील नवनवीन ठिकाणांची, चढाईची माहिती मिळेल.

ड्युक्स नोज मी कशी पोहचले कस क्लाइंबिंग केलं याबद्दल चा थरारक नागफणी सुळक्याची अनपेक्षित भेट या लेखात आवश्यक वाचा. 

Comments